सोलापूर : ‘स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर’ या घोषवाक्याला कृतीची जोड देत महापालिका प्रशासनाने शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरात कचरा संकलनाचे काम महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या स्वच्छतेसोबतच महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.प्रभाग क्रमांक ४ मधील महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीचे पहिले पाऊल म्हणून प्रभाग क्रमांक ४ मधील महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कचरा संकलनाची पद्धत, नागरिकांशी संवाद, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच स्वच्छतेबाबत घ्यावयाची काळजी याबाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी भाजपाचे नगरसेवक डॉ. किरण देशमुख, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेवक विनायक विटकर, भाजपाचे युवा नेते अजित गायकवाड, गणेश साखरे तसेच प्रशिक्षिका जान्हवी बने उपस्थित होते.
महिला बचत गटांच्या माध्यमातून कचरा संकलनाची जबाबदारी दिल्याने स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम मनुष्यबळ मिळणार आहे. त्याचबरोबर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. नागरिकांनीही ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीमध्ये देत या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महिलांच्या हाताला काम आणि शहराच्या स्वच्छतेला बळ, अशी दुहेरी भूमिका या उपक्रमातून साध्य होणार असल्याने प्रभाग ४ नंतर शहरातील इतर भागांतही या उपक्रमाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
Post Views: 78