सोलापूर : हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशनच्या वतीने बी.कॉम. अंतिम वर्ष आणि एम.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी ‘बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी : यशाचा मार्ग’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोलापूर येथील टाईम्स अकॅडमीचे संचालक श्री. आनंद जोशी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी, आयबीपीएससह विविध बँकिंग स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन तसेच मुलाखतीची प्रभावी तंत्रे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “आज योग्य आणि नियोजनबद्ध तयारी केली, तर उद्याच्या स्पर्धेत निश्चितपणे यश मिळवता येईल आणि बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडवता येईल,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राध्यापक सीए. डॉ. एस. जी. इंगळे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवीवर अवलंबून न राहता विद्यार्थ्यांनी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करावीत तसेच विविध स्पर्धा परीक्षांची सातत्यपूर्ण तयारी करावी, असे आवाहन केले.
या विशेष उपक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशनचे समन्वयक डॉ. एस. एस. जगताप, प्रा. पी. बी. शहा, डॉ. व्ही. एस. हसबनीस आणि प्रा. व्ही. यु. नायर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
प्रतीक्षा कोंडेकर आणि अभिषेक गायकवाड यांनी केले. प्रा. पी. बी. शहा यांनी आभार मानले.
या मार्गदर्शन सत्रास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 10