बार्शी – भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि अतूट नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी बार्शी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात घरोघरी उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच घराघरांत रक्षाबंधनाची लगबग सुरु होती. बहिणींनी भावांच्या मनगटावर प्रेमाचा राखीचा धागा बांधत त्यांच्या दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली.
वयाने लहान असणाऱ्या भावा-बहिणींचे रक्षाबंधन हे त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव, आनंद व प्रेमातून एका वेगळ्या प्रकारे दिसून येत होते. भावाने बहिणीसाठी आणलेल्या मिठाईचा स्वाद हे लहान भाऊ-बहीण एकत्रितपणे घेताना दिसून येत होते.
राखी बांधल्यानंतर भावांनी बहिणींना प्रेमाने भेटवस्तू देत तिच्या सुख-दुःखात सदैव साथ देण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी भाऊ-बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहताना दिसून आले. प्रत्येक कुटुंबांमध्ये पारंपरिक पद्धतीने औक्षण करुन रक्षाबंधनाचा सोहळा पार पडला.
रक्षाबंधन हा केवळ भावाच्या मनगटावर राखी बांधण्याचा सण नसून, भाऊ-बहिणीमधील प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि परस्परांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देण्याची भावना दृढ करणारा सण मानला जातो. काळ बदलला, जीवनशैली बदलली तरी या नात्याचे महत्त्व कायम आहे.
नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त दूर असलेल्या भावंडांनीही शक्य तितक्या लवकर घरी पोहोचून हा सण एकत्र साजरा केला. काही ठिकाणी दूर असलेल्या भावंडांनी ऑनलाइन माध्यमातून रक्षाबंधन साजरे केल्याचे समजते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने बार्शी शहर व तालुक्यात नात्यांमधील प्रेम, आपुलकी आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा धागा अधिक घट्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Post Views: 29