पंढरपूर – बीड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त रविंद्र रामचंद्र साखरे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर यांच्या गोशाळेतील गाई व वासरांच्या पशुखाद्यासाठी एक लाख रुपयांची देणगी अर्पण केली.
मंदिर समितीच्या ‘गोशाळा पशुखाद्य कायम ठेव’ या योजनेसाठी सदर देणगी देण्यात आली आहे. या देणगीतून मंदिर समितीच्या गोशाळेतील गाई व वासरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची गोशाळा पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील यमाई तलाव परिसरात असून, या गोशाळेमध्ये लहान-मोठ्या मिळून एकूण २५५ गाई व वासरे आहेत. या गोशाळेतील गोवंशाला नियमितपणे चारा व पशुखाद्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या संगोपनास हातभार लागावा, या उदात्त भावनेतून साखरे यांनी आपल्या जमापुंजीतून ही देणगी दिली आहे.
या देणगीबद्दल मंदिर समितीच्या वतीने देणगीदार यांचा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी देणगीदार साखरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. रवींद्र साखरे हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त असून, ते नियमितपणे पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. ‘गोसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून त्यांनी गोशाळेतील गाई व वासरांच्या चारा-पाण्याच्या व्यवस्थेसाठी दिलेली ही देणगी गोवंश संगोपनाच्या कार्याला निश्चितच हातभार लावणारी आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या गोशाळेतील गाई व वासरांच्या संगोपनासाठी तसेच पशुखाद्य व चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी देणगी देऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीच्या वतीने ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी देणगी देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविकांना रोख स्वरूपात, धनादेश (चेक), डिमांड ड्राफ्ट (डीडी), क्यूआर कोड स्कॅन करून तसेच आरटीजीएस (RTGS) या बँकिंग प्रणालीद्वारे देणगी अर्पण करता येते. याशिवाय, मंदिर समितीने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून तसेच मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही भाविकांना देणगी देता येते.
Post Views: 6