सोलापूर- स्त्री ही कुटुंबाचा आधार, समाजाची शक्ती आणि संस्काराचा अखंड स्त्रोत आहे. भारतीय संस्कृतीत स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले जाते. शारदीय नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचा आणि तिच्या कर्तुत्वाला वंदन करण्याचा पवित्र उत्सव आहे असे प्रतिपादन काशी जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले. एस.व्ही.सी.एस.हायस्कूल एमआयडीसी येथे नवरात्रोत्सवानिमित्त माता पालकांसाठी विविध मनोरंजनात्मक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशीर्वचन करताना महास्वामीजी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी संगप्पा म्हमाणे, संचालक शशिकांत रामपुरे, डीएड कॉलेजच्या प्राचार्या लक्ष्मी पाटील, मुख्याध्यापक धनंजय नकाते, उप मुख्याध्यापक सुहास काटगांव व पर्यवेक्षक केदार पटणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी माता तुळजाभवानी, श्री वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमा पूजनानंतर माता पालकांनी यल्लमा देवीच्या भक्ती गीतावर आकर्षक नृत्य सादर करून भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. त्यानंतर चार फेऱ्यांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पहिल्या फेरीत लिंबू चमचा, दुसऱ्या फेरीत पत्रावळीवर पाय ठेवून चालणे, तिसऱ्या फेरीत दोन्ही पायांमध्ये फुगा धरून चालणे व चौथ्या फेरीत दोरीला चिमटे लावणे असे नावीन्यपूर्ण व कौशल्याधारित स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेतील सुविधा बिराजदार प्रथम, संगीता मुंडासे द्वितीय व सुनीता पवार तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या माता पालकांचा जगद्गुरूंच्या हस्ते पैठणी साडी व शक्तीमाता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर पहिल्या व दुसऱ्या फेरीतील सहभागी माता पालकांना कुंकवाचा करंडा, तिसऱ्या फेरीतील स्पर्धकांना प्रत्येकी दोन स्टीलचे डबे तर अंतिम फेरीतील सहभागी माता पालकांना लंच बॉक्स व वॉटर बॉटल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकेतून मुख्याध्यापक धनंजय नकाते यांनी स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असून समाजाच्या प्रगतीची खरी शक्ती आहे. माता पालकांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि शाळा व पालक यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ व्हावा या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे सांगितले. या स्पर्धेत माता पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सांस्कृतिक विभाग प्रमुख रोहिणी कल्याणशेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर अनिता बंडगर यांनी आभार मानले.