पिलीव – माळशिरस तालुक्यासह इतर सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तातडीने त्यांच्या बँक खात्यात जमा करावा,व काही कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ऊसाचा पहिला हप्ता दिलेला नाही तोही तात्काळ जमा करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते अजित बोरकर यांनी केली आहे.त्यांनी
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आडसाली ऊस लागवड, मशागत, रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी तसेच ट्रॅक्टर भाड्यात झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे आर्थिक ताण वाढला आहे. रासायनिक खतांच्या गोणीचे दर सुमारे २,५०० ते २,७०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून, त्यांना तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे.
दुसरीकडे, राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यंदा समाधानकारक असल्याचा दावा त्यांनी केला. साखरेचा विक्री दर प्रति क्विंटल ५,००० ते ५,३०० रुपयांपेक्षा अधिक असून, किरकोळ बाजारात साखर ६५ रुपये प्रति किलोपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. तसेच बी-हेवी मोलॅसिसचा दर ६७ रुपये प्रति लिटर, हेवी मोलॅसिसचा दर ५५ रुपये प्रति लिटर आणि कच्च्या अल्कोहोलचा दर ६३ रुपये प्रति लिटर असल्यामुळे साखर कारखान्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांनी आपल्या आर्थिक क्षमतेचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रति टन ३०० रुपये दुसरा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा, अन्यथा मागणीचा विचार न केल्यास साखर कारखान्यातील साखर बाहेर पडू देणार नाही व साखर रोखू,असा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी ऊस दर संघर्ष समितीचे नेते,दिपक भोसले, अजित बोरकर,सचिन पाटील, भानुदास सालगुडे-पाटील ,जेष्ठ नेते मगन काळे, विजय नेवसे,अमरसिंह माने-देशमुख,दत्ता भोसले,गोपाळ घार्गे,निवास नागणे, दीपक सावंत,नेमचंद शिंदे, हनुमंत पाटील,कैलास इंगळे,सचिन आटकळे, विलास काळे, विजय वाघबंरे,उमेश काळे आदी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट _
यंदा चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांनी ऊसतोडीची गडबड न करता जरा थांबावे, उसाच्या कांडीला सोन्याचा भाव मिळवून देऊ. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने उसाची वाढ झालेली नाही. कर्नाटक राज्यातील साखर कारखाने लवकर सुरू होणार असल्याने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना उसाचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडी थांबुन सोसून आंदोलनाला पाठबळ द्यावे,
अजित बोरकर
तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना. फोटो _ साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता ताबडतोब द्यावा अशी निवेदन देताना दिपक भोसले, अजित बोरकर व इतर पदाधिकारी .
Post Views: 64