सोलापूर : आठवडाभरानंतर नळाला आलेले पाणी घरात भरत असताना विद्युत मोटारीचा शॉक लागून कुटुंबाचा एकमेव आधार असलेल्या एका २४ वर्षीय संगणक अभियंत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कुमठा नाका भागातील जीवन विकास नगरात आज रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
गणेश मनीष कांबळे (वय २४ वर्ष, रा. जीवन विकास नगर , कुमठा नाका सोलापूर) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. येत्या तीन महिन्यांवर त्याच्या बहिणीचा विवाह ठरला होता. लग्नाची तयारी सुरू असतानाच घरातील कर्ता मुलगा गमावल्यामुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज रविवारी सकाळी कुमठा नाका भागातील जीवन विकास नगरात नेहमीप्रमाणे सात-आठ दिवसांनंतर नळाला पाणी आले होते. पाण्याचा दाब अत्यंत कमी असल्याने गणेश याने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटार लावली होती . यादरम्यान सकाळी १० च्या सुमारास अचानक वीज गेली. काही वेळाने वीज पूर्ववत झाल्यावर गणेश पाण्याचा पाईप व्यवस्थित लावण्यासाठी गेला असता त्याला विजेचा जोरदार शॉक बसला. विजेचा धक्का बसताच तो मोठ्याने किंचाळला. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेत विजेचा प्रवाह खंडित केला आणि त्याला तातडीने पूर्व भागातील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात दुपारी दाखल करण्यात आला.
वडिलांचे पूर्वीच निधन – गणेश कुटुंबाचा एकमेव आधार
गणेशचे संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. पुण्यात दोन वर्षे इंटर्नशिप करून तो सहा महिन्यांपूर्वीच सोलापुरात परतला होता. सध्या तो एका मेडिकल मध्ये कामाला जात होता. त्याची आई मेसमध्ये काम करून घर चालवते, तर लहान भाऊ अद्याप शिक्षण घेत आहे. गणेशच्या वडिलांचे पूर्वीच निधन झाले असल्याने घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावरच होती.
Post Views: 26