सोलापूर : माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल, सोलापूर येथे भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच तथा महाराष्ट्र व्हॉलीबॉल पंच समितीचे प्रमुख अनिल गिरम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी इयत्ता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्साहवर्धक झुंबा नृत्याने कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. त्यानंतर क्रीडा प्रमुख कुमार प्रज्वल जाधव याने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी शिस्त, खिलाडूवृत्ती, सांघिक भावना आणि निरोगी जीवनशैली जोपासण्याचा संकल्प केला.
प्रमुख पाहुणे अनिल गिरम यांनी मार्गदर्शन करताना नियमित सराव, कठोर परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन आणि सांघिक भावनेचे महत्त्व अधोरेखित केले. विजय आणि पराभवातून शिकत सातत्याने प्रगती करण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना खेळातील शिस्त, समर्पण आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.
शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे महत्त्व अधोरेखित करताना अभ्यासासोबतच शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा संस्कार जोपासण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. इयत्ता पहिली ते दहावीच्या इंटर हाऊस क्रीडा स्पर्धांतील विजेत्या संघांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
Post Views: 5