बार्शी – तालुक्यातील लक्ष्याचीवाडी येथे दारुच्या नशेत विनाकारण शिवीगाळ करुन तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर लोखंडी गजाने डोक्यात मारुन जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्पू राजेश वायकर (वय २२, व्यवसाय मजुरी, रा. लक्ष्याचीवाडी) हे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चवरे यांच्या किराणा दुकानाजवळील रस्त्यावर असताना आरोपी सागर दादा भोसले याने दारुच्या नशेत त्यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर सागर भोसले याचा भाऊ अविनाश, आई अनिता आणि वडील दादा भोसले यांनी घटनास्थळी येऊन वायकर यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यावेळी सागर भोसले याने हातातील लोखंडी गजाने वायकर यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी ३० ऑगस्ट रोजी रात्री १०.४४ वाजता बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) व ३ (५) अन्वये सागर दादा भोसले, अविनाश दादा भोसले, दादा उत्रेश्वर भोसले आणि अनिता दादा भोसले (सर्व रा. लक्ष्याचीवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस हवालदार खांडेकर पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 4