बार्शी – तालुक्यातील आगळगाव येथे घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अनिल काकासाहेब लंगोटे (वय ३६, रा. आगळगाव, ता. बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० ते सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्यान लंगोटे हे घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या कुलुपाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये २ लाख रुपये रोख, दोन ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे बदाम, एक ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी आणि सात ग्रॅम वजनाचे सोन्याच्या मण्यांचे गंठन असा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३) व ३०५ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या आदेशाने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यावलकर पुढील तपास करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरु आहे.