धाराशिव – समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहन पंक्चर करून प्रवाशांना मारहाण करत लूट करणाऱ्या टोळीचा माग काढण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यात कोंबिंग ऑपरेशन राबवले. धाराशिव पोलिसांच्या सहकार्याने वाशी तालुक्यातील खामकरवाडी, तेरखेडा, उमरा आदी भागांत करण्यात आलेल्या कारवाईत सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांची कसून चौकशी सुरू असून, त्यांच्याकडून समृद्धी महामार्गावरील दरोड्यांबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी एका प्रवासी कारला लक्ष्य केले होते. वाहन अडवून प्रवाशांना मारहाण केल्यानंतर दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून पोबारा केला. याशिवाय महामार्गावरील अन्य काही वाहनांनाही अशाच पद्धतीने लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे समृद्धी महामार्गावरील रात्रीच्या प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या गंभीर घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले.
धाराशिव पोलिसांच्या मदतीने वाशी तालुक्यातील विविध गावांमध्ये संशयितांच्या हालचालींबाबत माहिती घेत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत सात संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
ताब्यात घेतलेल्या संशयितांचा समृद्धी महामार्गावरील दरोड्यांच्या घटनांशी थेट संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. तसेच या टोळीचे आणखी साथीदार कोण आहेत? महामार्गावरील लुटीच्या इतर घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
सात संशयितांच्या चौकशीतून समृद्धी महामार्गावरील लूटमार टोळीचे मोठे रॅकेट उघडकीस येते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 7