या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी तहसील प्रशासनाला निवेदन देऊन पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
कळंब तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शासनाने केवळ पंचनामे आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी कळंब तालुकाध्यक्ष प्रा. तुषार वाघमारे, शहराध्यक्ष बाळासाहेब कथले, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश निवृत्तिराव टकाळे, सरचिटणीस आत्माराम बिक्कड, चिटणीस भरत शिंदे, सचिव रमेश देशमुख, किसान सेल जिल्हाध्यक्ष औदुंबर धोंगडे, युवक तालुकाध्यक्ष भीमा हगारे, तालुका सचिव वाहेद पटेल यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त परिस्थितीची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान, पीक विम्याची प्रलंबित रक्कम आणि इतर शासकीय मदत त्वरित द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.





















