सोलापूर – गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अन्न व औषधी द्रव्य प्रशासन विभागा’ (FDA) कडून ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ आणि ‘अन्नदान’ यांचा विशेष उल्लेख करून सूचना व कारवाईचा इशारा देण्यात आला होता. सण-उत्सवांच्या काळात अन्नसुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदू धार्मिक उत्सवांवर निवडक पद्धतीने कारवाई होऊ नये आणि अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मीय सण-उत्सवांना समानपणे लागू केले जावेत, या मागणीसाठी मंदिर महासंघाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) ठाम भूमिका मांडली होती. त्यासंदर्भात सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून निवेदने देऊन FDA चे नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती.
या पाठपुराव्याला आता महत्त्वपूर्ण यश मिळाले असून FDA ने सर्व धर्मीय सण-उत्सवांच्या संदर्भात अन्नसुरक्षेच्या नियमांची समान अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे.
या निर्णयाचे मंदिर महासंघ स्वागत करते. हा निर्णय प्रशासनाची निष्पक्षता आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीचा विजय आहे. मात्र, केवळ कागदावर निर्णय घेऊन चालणार नाही, तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईपर्यंत मंदिर महासंघ यावर बारकाईने लक्ष ठेवून असेल. सरकारने आणि प्रशासनाने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत.
यापूर्वी कायदे अस्तित्वात असतानाही, ‘केवळ हिंदूंना कायदे आणि इतरांना फायदे‘ असे प्रशासनाचे दुटप्पी धोरण अनेकदा दिसून आले आहे. यापुढे प्रशासनाचे असे दुजाभावाचे धोरण कदापि खपवून घेतले जाणार नाही. भविष्यात अन्नसुरक्षेचे नियम स्पष्ट, पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान पद्धतीने लागू केले जातील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी



















