सांगोला – कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५ व्या स्मृती समारोहानिमित्त सांगोला विद्यामंदिरमध्ये सुरू असलेल्या भव्य राष्ट्रीय निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धेत दुसऱ्या दिवशीचे साखळी सामने अतिशय चुरशीचे आणि रोमहर्षक ठरले. ४ सप्टेंबरच्या सायंकाळच्या आणि ५ सप्टेंबरच्या सकाळच्या सत्रात झालेल्या या सामन्यांमध्ये मुंबई, केरळ, नागपूर आणि पुण्याच्या संघांनी आपले वर्चस्व गाजवत विजयी आगेकूच केली आहे.
श्वास रोखून धरायला लावणारे सामने (४ सप्टेंबर – सायंकाळचे सत्र) सायंकाळच्या सत्रात प्रेक्षकांना अत्यंत थरारक सामने पाहायला मिळाले. ‘क’ गटात जी.के.पी. मुंबई आणि बी.एस.सी. बी.ई.जी. सेंटर खडकी-पुणे यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली, ज्यामध्ये जी.के.पी. मुंबईने ५५-५३ असा अवघ्या २ गुणांनी विजय खेचून आणला. ‘फ’ गटातही असाच थरार पाहायला मिळाला नागपाडा मुंबई संघाने एस.के.बी.ए. पुणे संघाचा ६८-६६ असा अवघ्या २ गुणांच्या फरकाने पराभव करत रोमहर्षक विजय नोंदवला.इतर सामन्यांत ‘ब’ गटातून जयहिंद जिमखाना कडा-बीड संघाने सहारा स्पोर्ट्स सोलापूरचा ६८-५५ असा १३ गुणांनी पराभव केला. भारती विद्यापीठ पुणे संघाने नवी मुंबई फाल्कन्सवर (४९-२५), ग्रीनस्टार सोलापूरने टीम-काश नागपूरवर (४६-३७), तर मस्तान वाय.एम.सी.ए. मुंबईने ‘डू इट’ बास्केटबॉल कोल्हापूरवर (४३-१४) मात केली. ‘ग’ गटात एस.एन.जी. नागपूरने सेलिब्रेशन स्पोर्ट्स सोलापूरचा (४६-३०) पराभव केला. तर ‘अ’ गटात श्री केरळ वर्मा त्रिशूर संघाने बी.टी.एस. मिरज संघावर ४१-१९ अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला.नेक्सस नांदेडचा महाकाय विजय (५ सप्टेंबर – सकाळचे सत्र)सकाळच्या सत्रातही खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. ‘ई’ गटात नेक्सस स्पोर्ट्स अकादमी नांदेड संघाने नवी मुंबई फाल्कन्स संघाचा ४८-०२ अशा तब्बल ४६ गुणांच्या महाकाय फरकाने धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला. ‘ग’ गटात शिवरत्न स्पोर्ट्स अकादमी अकलूज संघाने सेलिब्रेशन स्पोर्ट्स सोलापूर संघाचा ४२-३९ असा ३ गुणांनी निसटता पराभव करत रंगत वाढवली.
याच सत्रात मस्तान वाय.एम.सी.ए. मुंबईने प्रा. शरद पाटील महाविद्यालय मिरज संघाला ४७-३९ असे पराभूत केले. एस.के.बी.ए. पुणे संघाने प्रिन्स युनायटेड कोल्हापूरचा (५२-१८), तर टीम-काश नागपूरने यजमान बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकादमी सांगोला संघाचा (५३-१४) पराभव केला. ‘ब’ गटात समायरा अकादमी मुंबईने सहारा स्पोर्ट्स सोलापूरवर ५५-४५ अशी मात केली. जी.के.पी. मुंबईने एस.टी.बी.ए. सांगोला संघाला (५८-४६) हरवत आपला सलग दुसरा विजय नोंदवला. तसेच, श्री केरळ वर्मा त्रिशूर संघाने हाय-५ युथ फाउंडेशन मुंबई संघाचा ५९-४१ असा पराभव करत गटातील आपले वर्चस्व सिद्ध केले. साखळी सामन्यांमधील या अटीतटीच्या लढतींमुळे स्पर्धेची रंगत आता शिगेला पोहोचली असून, अव्वल दोन संघांत येऊन बाद फेरीत पोहोचण्यासाठी सर्वच गटांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
चौकट-
विश्वेश झपकेंच्या स्वप्नाला गरुडझेप: सांगोल्यातून घडताहेत भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू
सांगोल्याच्या या भव्य इनडोअर स्टेडियममध्ये स्थानिक खेळाडूंसाठी हक्काची आणि दर्जेदार अकॅडमी असावी, हे संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके यांचे एक सुंदर स्वप्न होते. आज ते स्वप्न प्रत्यक्ष मैदानात साकार होताना पाहून मनस्वी आनंद होत आहे. गुरुवर्य बापूसाहेबांच्या नावाने सुरू असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धांसोबतच, २६ जानेवारी २०२६ रोजी सुरू झालेल्या बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी’ अंतर्गत चालणाऱ्या संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमी’ (सांगोला शहर व तालुका बास्केटबॉल असोसिएशनशी संलग्न) अल्पावधीतच मोठी गरुडझेप घेतली आहे. याच मैदानातून घडलेले आणि भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार व प्रशिक्षक संभाजी कदम यांचे मार्गदर्शनाखाली आज ६ ते २१ वयोगटातील १०० हून अधिक खेळाडू येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेत आहेत. नुकत्याच झालेल्या ‘रायझिंग स्टार लीग’मध्ये या नवोदितांनी दाखवलेली जिद्द अतिशय कौतुकास्पद होती. त्यामुळे संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीचे तंत्र सहाय्यक गणेश नागणे, अकॅडमीचे मार्गदर्शक सागर कदम व समन्वयक प्रशांत मस्के, शरद नागणे, नरेंद्र होनराव यांच्या योगदानातून सुरू असलेला हा क्रीडायज्ञ सांगोल्याच्या क्रीडा परंपरेला नक्कीच सुवर्ण झळाळी देईल.
-प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, अध्यक्ष सां.ता.शि.प्र.मंडळ, सांगोला