सोलापूर : आगामी गणेशोत्सव निर्विघ्न, शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी सोलापूर महापालिकेने व्यापक तयारी सुरू केली आहे. महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी महापौर कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्यानंतर महापौरांसह महापालिका, पोलिस प्रशासन, महावितरणचे अधिकारी आणि मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख विसर्जन घाट व गणेशोत्सव मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक अभियंता सुनीता हिबारे, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वेदांत बॉम्बे, एन. टी. मुजावर, पी. डी. राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.तसेच सिद्धेश्वर देवस्थानचे ट्रस्टी शिवकुमार पाटील, मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, माजी उपमहापौर पद्माकर काळे, सुनील रसाळे यांच्यासह विविध मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळांचे ट्रस्टी व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी लोकमान्य संयुक्त मध्यवर्ती महामंडळाचे बाळासाहेब गायकवाड, लष्कर मध्यवर्ती महामंडळाचे सिद्राम चोपडे, पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे संजय साळुंखे, विजापूर रोड मध्यवर्ती महामंडळाचे विश्वनाथ कोळी, विडी घरकुल मध्यवर्ती महामंडळाचे वासुदेव लोखंडे , जी. अशोक कलशेट्टी, गौरीशंकर जग्गापुरे, मल्लिनाथ याळगी, विजय पुकाळे, बी.एम.डी. म्हटले, गडदे, सागर पुकाळे, विश्वनाथ आमने, उमा डेंगळे, अनिल गवळी, लता फुटाणे, हेमा चिंचोळकर, नागेश मैत्री, श्रीकांत गाडगे आणि सचिन स्वामी आदी उपस्थित होते.
विसर्जन घाटांची प्रत्यक्ष पाहणी
बैठकीनंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या समवेत अधिकाऱ्यांनी गणपती घाट, विष्णू घाट, धर्मवीर संभाजी तलाव आणि कंबर तलाव येथील विसर्जन कुंडांची पाहणी केली. गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक आणि गणेश मंडळे येथे येणार असल्याने विसर्जन कुंड, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षितता, पाणीपुरवठा, वाहतूक नियोजन आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधांचा आढावा घेण्यात आला.
मिरवणूक मार्गावरील अडथळे हटविणार
गणेशोत्सव मिरवणुकीच्या प्रमुख मार्गाचीही महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी लोंबकळणाऱ्या केबल वायर्स, झाडांच्या फांद्या, रस्त्यावरील खड्डे, ट्रिमिंग लाईन, पाण्याच्या पाइपलाइन तसेच इतर तांत्रिक अडथळ्यांची नोंद घेण्यात आली.गणेश मंडळांना मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी हे सर्व अडथळे गणेशोत्सवापूर्वीच दूर करण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी संबंधित विभागांना दिले. रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, धोकादायक फांद्यांची छाटणी करणे, केबल वायर्सची योग्य व्यवस्था करणे आणि पाइपलाइनमुळे निर्माण झालेले अडथळे दूर करण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
विभागनिहाय समन्वय बैठका
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सव मंडळे, संबंधित मध्यवर्ती महामंडळ, महावितरण आणि पोलिस प्रशासन यांच्या समन्वयाने बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकीत गणेश मंडळांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
प्रशासनाने वेळेत सर्व तयारी
पूर्ण करावी : महापौर कोंड्याल
महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, श्री गणेशोत्सव हा सोलापूर शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचा उत्सव आहे. गणेश मंडळे, भाविक आणि नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेत सर्व तयारी पूर्ण करावी. महापालिका, पोलिस प्रशासन, महावितरण आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयाने काम करून उत्सव शांततेत व सुरक्षित वातावरणात पार पाडावा, असे आवाहन केले.
——-