सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्वीकार व सुरक्षिततेबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर महानगरच्या वतीने मा. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांना निवेदन देण्यात आले.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून विविध शैक्षणिक व प्रशासकीय कामांसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे अधिकृत कार्यालयात जमा न करता शिक्षकांकडे ठेवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे, गुणपत्रिका व इतर महत्त्वाची कागदपत्रे ही अत्यंत संवेदनशील स्वरूपाची असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी मागणी अभाविपच्या वतीने करण्यात आली.
विद्यार्थ्यांची कागदपत्रे स्वीकारण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अधिकृत कार्यालयीन व्यवस्था निर्माण करून सर्व कागदपत्रे कार्यालयातच स्वीकारावीत, तसेच त्यांची योग्य नोंद ठेवून सुरक्षित जतन करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी अभाविप सोलापूर महानगर मंत्री रविकांत चांभार, पश्चिम भाग नगर मंत्री राहुल बोरगाव, विद्यापीठ अध्यक्ष ओम गुरव तसेच अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते.



















