बार्शी – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना बार्शी तालुका पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई करत शस्त्रांसह ताब्यात घेतले. ग्राम सुरक्षा दल, कोरफळे यांनी दिलेल्या सतर्क माहितीच्या आधारे सपोनि अक्षय सोनवणे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत ही कारवाई केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य दरोड्याचा डाव घडण्यापूर्वीच उधळून लावण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री कोरफळे ते यमाई जाणाऱ्या रस्त्यालगत, सोमनाथ शेरखाने यांच्या शेताजवळ, मौजे कोरफळे येथे करण्यात आली. संशयास्पद व्यक्ती दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती ग्राम सुरक्षा दलाकडून मिळाल्यानंतर सपोनि अक्षय सोनवणे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून पाचही संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये पप्पू शहाजी शिंदे (वय ३९), आकाश बाशा भोसले (वय ३०), बापू शहाजी शिंदे (वय ६०), मनोज बापू शिंदे (वय १९, सर्व रा. लाडोळे, ता. बार्शी) तसेच इनामदार श्रीमंत भोसले (वय ३५, रा. तांबेवाडी, ता. बार्शी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून हत्यारांसह दोन मोटारसायकली असा एकूण १ लाख ४० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. सपोनि अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि आबासाहेब शिरगिरे व पोलीस अंमलदार प्रदीप जगताप, सागर वाकळे, सोमनाथ खांडेकर, रमेश माने, गोविंद बचुटे, युवराज गायकवाड, अमृत खेडकर, अरुण डुकळे, शंकर खराडे, राजेंद्र कावळे, सिद्धेश्वर लोंढे व महेश माने यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Post Views: 16