सोलापूर- तळे हिप्परगा येथील नागेश करजगी ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्राचार्यांचे मार्गदर्शन कार्यक्रम 2026-27’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास मेतन, उपप्राचार्य डॉ. व्ही. के. पत्की, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. एस.डी. जाधव व सर्व विभागप्रमुखही उपस्थित होते.
ऑर्किड महाविद्यालय हे स्वायत्त संस्था व नॅक ए प्लस मानांकित आहे. पुढे प्राचार्यांनी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या चार वर्षांचा कालावधी केवळ पदवी मिळविण्यासाठी न घालवता ज्ञान, कौशल्य, व्यक्तिमत्त्व, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव विकसित करण्यासाठी उपयोगात आणावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची ओळख, संस्थेच्या उपलब्धी, स्वायत्त दर्जा, ऑर्किड एज्युकेशन सिस्टीम, चार वर्षांचा प्रभावी शैक्षणिक प्रवास तसेच नियम व नियमावली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असा संदेश देण्यात आला.
महाविद्यालयाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना स्थानिक मुळांशी जोडलेले आणि जागतिक स्तरावर सक्षम शिक्षण देणे हे असून, शैक्षणिक गुणवत्तेसोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही संस्थेचा भर आहे. कार्यक्रमामुळे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन, शैक्षणिक नियोजन आणि पुढील चार वर्षांच्या विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन मिळाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. माधुरी इंगळे, डॉ. मुमताज शेख, डॉ. उमाकांत जाधव व प्रथम वर्ष विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.




















