सांगोला – सांगोल्यातील कवयित्री डॉ.वैशाली हसबे-काशिद यांच्या पदराचे पंख पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे, डॉ.सयाजीराजे मोकाशी, माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील, भाजपाचे शिवाजीराव गायकवाड, लेखिका मेघा पाटील, कवयित्री पुष्पलता मिसाळ, लेखक इंद्रजित घुले यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी मनोगतात नीलम माणगावे यांनी कवयित्रींनी केवळ कवितेपुरते मर्यादित न राहता कथा, ललित सारख्या विविध प्रकारच्या लेखनातही स्वतःचे योगदान दिले पाहिजे, असा सल्ला दिला. डॉ.सयाजीराजे मोकाशी यांनी आजच्या काळात साहित्य क्षेत्रात महिलांचा मोठा दबदबा निर्माण झाला असून, स्त्रिया आपली प्रगल्भ मते मांडत आहेत, ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगोल्यातील महिला साहित्य क्षेत्रात पुढे येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. त्याच प्रमाणे माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर, मेघा पाटील, पुष्पलता मिसाळ, शिवाजीराव गायकवाड, इंद्रजित घुले यांनी डॉ.काशिद यांच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा महांकाळ, प्रास्ताविक डॉ.विजय काशिद यांनी केले.