बार्शी – बैलपोळा हा शेतकरी आणि पशुधनाच्या जिव्हाळ्याचा सण. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने बैलपोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्यांवर ‘शिमगा’ साजरा करण्याची वेळ आली आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिके करपून गेली असून, हातातोंडाशी आलेला घासही हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, पोटाला चिमटा घेत मुक्या जनावरांच्या चाऱ्यासाठी धडपड करीत असल्याचे विदारक चित्र बार्शी तालुक्यात पाहायला मिळत आहे.
बार्शी तालुक्यातील जामगांव (पा) येथील शेतकरी प्रकाश मोतीराम यादव यांनी पावसाअभावी करपून गेलेल्या सोयाबीनची काढणी सुरु केली आहे. मात्र ही काढणी बाजारात विक्रीसाठी नव्हे, तर जनावरांना चारा म्हणून केली जात आहे. सोयाबीनची काढणी साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात सुरु होते. परंतु यंदा पावसाने दडी मारल्याने पीक वेळेआधीच करपले आहे.
पेरणी, खते, औषध फवारणी यासाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च पावसाअभावी मातीत गेला आहे. उत्पादनाच्या अपेक्षेने उभ्या केलेल्या पिकातून यंदा उत्पन्न तर दूरच; उलट जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे ‘शेतात पीक नाही आणि गोठ्यात चारा नाही’, अशी दारुण परिस्थिती निर्माण झाली आहे.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे.वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याबरोबरच शेतकरी आणि पशुपालकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.