सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची २२ सप्टेंबर रोजी होणारी ३८वी अधिसभा (सिनेट) बैठक आता ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने होणार आहे.
वर्षातून केवळ दोनदा होणाऱ्या या सर्वोच्च सभेपासून अधिसभा सदस्यांना दूर ठेवण्याचा व थेट प्रश्नोत्तरांवरून पळ काढण्याचा हा विद्यापीठाचा डाव असल्याचा आरोप बहुतांश अधिसभा सदस्यांनी केला होता. बैठक प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन घेण्याच्या विद्यापीठाच्या सोयीस्कर भूमिकेवर या सदस्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. प्रशासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत कुलगुरु प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांनी ही बैठक ऑनलाईन घेत असल्याचे व यामुळे विद्यापीठाचा या बैठकीसाठी होणारा सात लाख रुपयेचा खर्च वाचणार असल्याचे सांगितले होते.
याचे वृत्त प्रसिद्ध होताच गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत याचे पडसाद उमटले. सभा सुरू होण्याअगोदरच व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. परंतु कुलगुरू ऑनलाइन मीटिंग घेण्याबाबत ठाम होते. त्यामुळे विद्यापीठाचे अधिकारी वगळता राहिलेल्या सदस्यांनी वॉकआऊट करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीस ऑनलाइन उपस्थित असलेले पद्मजादेवी मोहिते पाटील, डॉ. शशिकांत गायकवाड व अजित पाटणकर यांनीही सिनेट बैठक ऑफलाईन घ्यावी अशी मागणी केली. अखेर त्यातून मार्ग काढताना कुलगुरूंना आता सिनेट सभा ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने होणार असल्याचे व्यवस्थापन परिषद सदस्यांना सांगावे लागले . त्यानंतरच ही बैठक सुरू झाली. यासाठी सिनेट सभा ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने होणार असल्याचे राज्यपाल तथा कुलपती यांची परवानगी घेतली जाणार आहे. त्यानंतर हा निर्णय सर्व सदस्यांना मेलने कळविण्यात येणार आहे. संबंधित सर्व सदस्यांनी मेल करून ऑनलाइन का ऑफलाइन उपस्थित राहणार आहे हे मेलने कळवावे लागेल.
——-
या सदस्यांनी केला होता ‘वॉकआऊट’
राज्यपाल प्रतिनिधी देवानंद चिलवंत, संस्था प्रतिनिधी महादेव कमळे, प्राचार्य प्रतिनिधी डॉ. कैलास कारंडे, प्राध्यापक प्रतिनिधी डॉ. समाधान पवार, पदवीधर प्रतिनिधी राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड.
——–
सुटा संघटनेच्या सदस्यांचीही ऑफलाईन मागणी
सिनेट सभा ऑफलाईनच घ्यावी, असा निर्णय सुटा संघटनेच्या सिनेट सदस्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. याचे निवेदन आम्ही कुलगुरूंना देणार आहोत. दरम्यान सिनेट सदस्य ॲड. उषा पवार यांनी या अगोदरच मेलवर ही मागणी केली आहे
– प्रा. डॉ. नेताजी कोकाटे
जिल्हाध्यक्ष, सुटा संघटना
———–
विद्यापीठ विकास मंचचे निवेदन
सिनेट बैठक ऑफलाईन घ्यावी यासाठी विद्यापीठ विकास मंच वतीनेही गुरुवारी कुलगुरू डॉ. महानवर यांना निवेदन दिले. यावेळी विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. वीरभद्र दंडे, प्राचार्य शशिकांत तांबे, शोभा बोल्ली, चन्नविर बंकुर, यतिराज होणमाने, डॉ. मंगेश वेदपाठक, प्रा. प्रभाकर कोळेकर, डॉ. अनिल घनवट, डॉ. विकास कडू आदी उपस्थित होते.
——–























