पंढरपूर- शाळेच्या चार भिंतीमध्ये परिसर अभ्यास विषय न शिकवता निसर्गात जाऊन त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यास ते शिक्षण आयुष्यभरासाठी उपयोगी पडते. याचाच प्रत्यय भंडीशेगाव केंद्रातील विद्यार्थ्यांनी ४२ एकरावरील ड्रीम गार्डन येथे नैसर्गिक सहलीतून घेतला. वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की विद्यार्थ्यांच्या या नैसर्गिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक,पालक,अधिकारी व पदाधिकारीही सहभागी झाले होते.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आपल्या सभोवतालच्या परिसरातील नैसर्गिक संपत्ती, पशुपक्षी, पाण्याचे स्त्रोत, आहार विहार, राहणीमान, पिके या संदर्भातील माहिती परिसर अभ्यास या विषयामध्ये समाविष्ट असते. वर्गामध्ये हा विषय न शिकवता प्रत्यक्ष निसर्गात जाऊन शिकल्यास तो अधिक परिणामकारक होईल या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या गाजरेवस्ती शाळेने या उपक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले होते. त्यास प्रतिसाद देत बरडवस्ती शेळवे, नाईकनवरेवस्ती वाडीकुरोली, भंडीशेगाव व वाडीकुरोली या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी, पालक व विद्यार्थ्यासह या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.
भंडीशेगाव येथील बेचाळीस एकरावर साडे सतरा हजार देशी वृक्षांचे रोपण करून ड्रीम गार्डन बनवण्यात आलेले आहे. त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना निसर्ग अभ्यासक श्रीकांत बडवे यांनी विषारी; बिनविषारी सर्प, विविध झाडे वेली, पशु पक्षी व नैसर्गिक माहिती देत दिवसभर या जंगलामध्ये फिरत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रशांत वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री लोंढे तर जस्मिन पठाण यांनी आभार मानले. गटविकास अधिकारी अमोल जाधव, गट शिक्षणाधिकारी रोहन कांबळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिनिधी संतोष बागल, शिक्षण विस्तार अधिकारी शारदा रासकर, सोलापूर सोशल फाउंडेशनचे विजय पाटील, सरपंच गणेश पाटील यांनी यावेळी नैसर्गिक संपत्ती व विश्व मंगल मराठी फाउंडेशनच्या मिशन ४६ याविषयी सर्वांशी संवाद साधला. प्रचारक हर्षवर्धन महाडिक, मुख्याध्यापिका सविता बर्गे, जस्मिन पठाण, प्राची येलमार सोळशे, सत्यवान पवार, मुख्याध्यापिका राजश्री लोंढे,हुसेन मुलानी,मंगेश नकाते, शशिकांत महाजन, आकाश गाजरे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गा विषयी माहिती दिली.
Post Views: 12