सोलापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी मिरवणूक मार्गावरील धोकादायक व खाली आलेल्या विद्युत तारा, केबल्स तसेच अन्य अडथळे तातडीने दूर करा, असे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना दिले.
महापौर कोंड्याल यांनी गुरुवारी शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा केला. चिप्पा मार्केट परिसर, कर्णिक नगर येथील उद्यान व चिल्ड्रन पार्क तसेच एमआयडीसी परिसरातील विविध ठिकाणी त्यांनी भेट देऊन नागरी सुविधांचा आढावा घेतला. संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक समस्यांची माहिती घेत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
चिप्पा मार्केट परिसरातील पाहणीदरम्यान नागरिक आणि व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची महापौरांनी माहिती घेतली. स्वच्छता, नागरी सुविधा आणि आवश्यक कामांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर कर्णिक नगर येथील उद्यान आणि चिल्ड्रन पार्कची पाहणी करण्यात आली. उद्यानातील स्वच्छता, देखभाल व दुरुस्तीची कामे तसेच लहान मुले आणि नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त सुविधांचा आढावा घेण्यात आला. उपलब्ध सुविधांमध्ये सुधारणा करून उद्यान अधिक चांगले करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
विसर्जन कुंडाचीही पाहणी एमआयडीसी परिसरातील एमएसईबी कार्यालयाला भेट देऊन महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गणेशोत्सव काळात मिरवणुकीच्या मार्गावर विद्युत तारांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला. धोकादायक तारा, केबल्स आणि इतर अडथळे वेळेत हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सुनील नगर येथील गणेश विसर्जन कुंडाचीही पाहणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सभापती विजय चिप्पा, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, शेखर इगे, सुनीता कामाठी, विजय चिप्पा, सत्यनारायण गुर्रम, राजमहिंद्र कमटम, मेघनाथ येमूल, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहायक आयुक्त युवराज गाडेकर, अनिल चराटे, शंकर चौगुले, झोन अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह महापालिका व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
—
Post Views: 7