बार्शी – कामगार वर्ग शेतकऱ्यांच्या २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होईल व शेतकऱ्यांना दुष्काळाच्या खाईमधून बाहेर काढण्यास मदत करेल. डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमधील कामगार हे स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी आतापर्यंत संघर्ष करत राहिलेले आहेत. परंतु त्यांची वैचारिक बांधणी झाल्यामुळे ते श्रमिक वर्गाच्या चळवळीचे महत्त्वाचा आधार बनत आहेत आणि त्याचमुळे ते शेतकऱ्यांच्या दुष्काळासाठी चालू होणाऱ्या आंदोलनामध्ये ताकदीने साथ देतील. २१ सप्टेंबर रोजी बार्शी तालुका दुष्काळ जाहीर करा ही मागणी घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरणार आहेत यावेळी हॉस्पिटल कामगार वर्ग शेतकऱ्यांना मदत करायला उतरेल, असे कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले.
यावेळी कॉ. ए. बी. कुलकर्णी म्हणाले, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल कामगारांचे हे अधिवेशन बार्शी शहरातील हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना संघटित होण्यासाठी प्रेरणा देईल. बार्शी शहरात हॉस्पिटल कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. परंतु त्यांना कायद्याप्रमाणे किमान वेतन मिळत नाही. बार्शीतील हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी पुढील काळात एकत्र येऊन श्रमिक वर्गाच्या लढ्याचा भाग व्हावे.
यावेळी कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ. भारती मस्तुद यांनी केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांचा कामगार वर्गाचा पोवाडा दत्तात्रय ढवळे, प्रांजली कदम, प्रमोद कदम यांनी गायला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. प्रवीण मस्तुद, बांधकाम कामगार संघटनेचे अनिरुद्ध नखाते, बालाजी शितोळे, आनंद गुरव, प्रमोद मंडलिक, श्रीकांत सोरेगावकर, किसन मुळे, बिभीषण होरकुडे, अब्बास बागवान, निर्मला सरवदे, शकील मुलाणी, विशाल लालबेग, आकाश कदम, दिनेश डोंबे, सत्यभामा जाधवर, चंद्रकांत देशमुख , मायकल भट आदी उपस्थित होते.






















