पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका घोळसगावसह तालुक्यालील सर्वच परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे , पिकांच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. घोळसगाव, बोरगाव, बादोले, किणीवाडी, किरनळी यांसह वागदरी व किणी मंडळातील अनेक भागांत शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
पेरणीपासून आतापर्यंत बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी मोठा खर्च करूनही अपेक्षित पाऊस न मिळाल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. काही शेतकऱ्यांना उत्पादनातून पेरणीचा खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेषतः सोयाबीन,उडीद पिकाला मोठा फटका बसला असून, काही शेतकऱ्यांवर उभे पीक सोडून देण्याची अथवा ट्रॅक्टर चालवून पीक काढून टाकण्याची वेळ आली आहे. महिन्यांच्या मेहनतीनंतर उभे केलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि हतबलता आहे.
नुकसानग्रस्त भागाची प्रशासनाने तातडीने पाहणी करून प्रत्यक्ष शेतावर पंचनामे करावेत आणि शासनाच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चौकट
“पाच एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर चालवताना मनाला अतिशय दुःख झाले. महिने-महिने मेहनत करून जपलेले उभे पीक डोळ्यांसमोर नष्ट करावे लागले. गावातील अनेक शेतकऱ्यांचीही अशीच परिस्थिती आहे. पिकासाठी केलेला बियाणे व खताचा खर्चही निघणार नाही, अशी अवस्था आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासनाची मदत जाहीर करावी.”
— पंडित बादोले, शेतकरी, घोळसगाव
Post Views: 13