धाराशिव – कामगारांच्या विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय श्रमिक महासंघाची महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाकडे श्रमिक संघ अधिनियम, १९२६ अंतर्गत अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची निवडही करण्यात आली.
महासंघाच्या अध्यक्षपदी धाराशिवचे आनंद भालेराव, उपाध्यक्षपदी नंदकुमार मानाळे, सरचिटणीसपदी सुहास साका, तर सहसरचिटणीसपदी सुरज भालेराव यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी रवी पवार, तर सदस्य म्हणून आशा लोंढे आणि सरदार शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कामगारांचे हक्क, त्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अधिकृत नोंदणीमुळे कामगारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ उपलब्ध झाले असून, आगामी काळात राज्यभरातील कामगारांच्या प्रश्नांवर महासंघ सक्रिय भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बांधकाम कामगार मंडळाकडून बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठीच्या शैक्षणिक योजना बंद करण्यात आल्याचा आरोप करत अध्यक्ष आनंद भालेराव यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचा निषेध म्हणून विरोधात धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.
बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठीच्या शैक्षणिक योजना पूर्ववत सुरू होईपर्यंत महाराष्ट्रभर महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय श्रमिक महासंघाचे अध्यक्ष आनंद भालेराव यांनी दिला आहे.
Post Views: 10