सोलापूर – राज्य उत्पादन शुल्क आणि मंद्रूप पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) गावच्या हद्दीत धडक कारवाई करत बनावट परदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत २,३५,१८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार झाला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नांदणी येथील ‘हॉटेल निसर्ग’च्या पाठीमागे असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट परदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात पोलिसांनी ‘रॉयल स्टॅग’ व्हिस्कीच्या १८० मि.ली. च्या ३८४ बाटल्या, ‘इम्पिरियल ब्लू’च्या १४४ बाटल्या, ‘रॉयल चॅलेंज’च्या ४८ बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांमध्ये भरलेली बनावट दारू, २५० रिकाम्या बाटल्या, २०० बनावट बुच्चे, एक दुचाकी वाहन आणि मोबाईल जप्त केला आहे.
या प्रकरणी अण्णाराय बसप्पा भुती (रा. माशाळ, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी, सध्या रा. नांदणी) याला अटक करण्यात आली असून सचिन राठोड उर्फ कृष्णा राठोड हा आरोपी फरार आहे. आरोपींविरुद्ध दारूबंदी अधिनियम १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक देवीदास करंडे, निरीक्षक अविनाश घाटगे, दुय्यम निरीक्षक एस.बी.शेळके, राम निबाळकर, गणेश गोले, शिवकुमार कांबळे, पोलीस अंमलदार गुरव, गणेश पाटील, निखिल जानकर गजानन ढब्बे, तानाजी जाधव, सितारे, कपील स्वामी यांनी पार पाडली.
Post Views: 11