सोलापूर – गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ उपचारात्मक सेवांवर अवलंबून न राहता प्रतिबंधात्मक आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, शिक्षण आणि जनसहभाग या घटकांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. ‘निरोगी गाव’ निर्मितीसाठी विविध विभागांचा समन्वय आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी सांगितले.
( टीप मेल वरील फोटो लावणे)
जिल्हा परिषदेच्या वतीने ‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ या संकल्पनांच्या अनुषंगाने ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन व ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) प्रसाद मिरकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
गावातील आरोग्यविषयक गरजा ओळखून स्थानिक पातळीवर कृती आराखडा तयार करणे, नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देणे, यावर डॉ. कोपुरवाड यांनी भर दिला. आरोग्य विभागासोबत ग्रामपंचायत, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता आणि महिला व बाल विकास विभागाने समन्वयाने काम केल्यास अभियानाला अधिक परिणामकारक दिशा मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
( टीप मेल वरील फोटो लावणे)
पुणे विभागीय समन्वयक अमित शर्मा व गणेश ननवरे यांनी अभियानाची कार्यपद्धती, गावपातळीवरील
नियोजन आणि उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी शासनाच्या तरतुदी तसेच पुरस्कारासाठी विचारात घेतल्या जाणाऱ्या आरोग्य निर्देशांकांची माहिती दिली. यावेळी निरोगी नागरिक – आरोग्य संपन्न गाव – सशक्त सोलापूर’ या उद्दिष्टासाठी गावागावांत समन्वित कृती करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
कार्यशाळेत संसर्गजन्य व जीवनशैलीजन्य आजारांचे प्रतिबंध, महिला-बालक व ज्येष्ठांचे आरोग्य, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि आरोग्य नोंदी याबाबत कृतीशील नियोजनावर भर देण्यात आला. गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले.