पंढरपूर – एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाचा (TY Mechanical Engineering) विद्यार्थी यश सतीश चव्हाण याने दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या विद्यापीठस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. या विजयामुळे यशची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशने अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपल्या कौशल्य, आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाचे दर्शन घडविले. विद्यापीठस्तरावर विजेतेपद मिळवत त्याने पुढील अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय स्तरावर महाविद्यालय व विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला आहे. विद्यापीठस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्वाची संधी मिळते.
यशच्या या यशाबद्दल यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
यशची ही कामगिरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली आहे. त्याच्या या यशामुळे एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
Post Views: 10