सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, कार्य आणि कर्तृत्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हिंदवी परिवाराच्या वतीने सोलापुरातील खंदक बगीचा येथे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी विशेष शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम तरुणांसह नागरिकांसाठी वैचारिक आणि प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे.
दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी बरोबर ८ वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात होते. सुरुवातीला पुस्तक वाचन, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर डॉ. शिवरत्न शेटे यांचे प्रभावी व्याख्यान आणि शेवटी साडेनऊ वाजता वंदे मातरम् या गीताने कार्यक्रमाची सांगता होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शिवचरित्र ऐकण्याचा अनुभव उपस्थितांसाठी अभूतपूर्व ठरत आहे.
आजच्या व्याख्यानात डॉ. शिवरत्न शेटे यांनी डीजेच्या वाढत्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम सांगत गणेश मंडळांनी गणेशोत्सव अधिकाधिक पारंपरिक, सांस्कृतिक आणि सामाजिक भान जपत साजरा करण्याचे आवाहन केले. उत्सवातील ध्वनिप्रदूषणापेक्षा संस्कृती, परंपरा आणि समाजप्रबोधनाला महत्त्व देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडला. शिवाजी महाराजांची आरती करून किंवा त्यांचे मंदिर उभारून त्यांना केवळ देवत्व देण्यापेक्षा, त्यांनी हाडामासाचा माणूस म्हणून केलेले असामान्य कर्तृत्व समजून घेणे आणि ते पुढील पिढीसमोर आदर्श म्हणून उभे करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. महाराजांच्या जीवनातील संघर्ष, दूरदृष्टी, शौर्य, संघटनकौशल्य आणि लोककल्याणाची भूमिका तरुणांनी जाणून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, पोलीस आयुक्त राजकुमार, महापालिका आयुक्त ओंबासे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महापालिकेचे पक्षनेते नरेंद्र काळे, नगरसेवक विनोद भोसले, बिजू प्रधाने, सात्विक बडवे, शिवाजी गायकवाड, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत, अविनाश महागावकर, शहाजी पवार आणि प्रशांत बडवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.






















