मुंबई: आजच्या काळात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत; परंतु त्या सुविधा प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचणे ही तितकीच महत्त्वाची बाब आहे. अनेक वेळा आर्थिक अडचणी, माहितीचा अभाव किंवा योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे सामान्य माणूस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु सुप्रसिद्ध neurological &spine surgeon डॉ पी एस रामाणी हे गेली ५४ वर्षे सातत्याने एक दिवसाचा मेडिकल कॅम्प आयोजित करीत आहेत, शारीरिक दुःखाने उभे राहू न शकणाऱ्या ‘पीडित माणसासाठी एक देव माणूस उभा राहतो’ वैद्यकीय शिबिर ही केवळ तपासणीची व्यवस्था न राहता; ते आशेचे दार बनते. हा या भावनेचा एक सुंदर आविष्कार आहे असे मी समजतो असे भावपूर्ण उदगार मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी काढले.
सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. पी. एस. रामाणी यांनी गरजू व्यक्तींना मदत व्हावी, त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे आणि आरोग्यसेवा त्यांच्या जवळ पोहोचावी, या उद्देशाने दादर हिंदू कॉलनी येथे शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मोफत शिबिर आयोजित केले होते त्यावेळी मालुसरे बोलत होते. मालुसरे पुढे असेही म्हणाले की, डॉक्टर होणे ही एक मोठी गोष्ट आहे; पण आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग समाजातील गरजू व्यक्तींसाठी करणे, ही त्याहून मोठी सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत एक सुंदर विचार आहे. “सेवा परमो धर्मः” रुग्णाला केवळ औषधाची गरज नसते; त्याला विश्वासाची, आपुलकीची आणि धीर देणाऱ्या शब्दांचीही गरज असते. ‘ताठ कणा’ हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर बनला ते डॉ रामाणी या उपक्रमाच्या केंद्रस्थानी गरजू माणूस ठेवून वयाच्या ८८ व्या वर्षी स्वतःला तंदुरुस्त ठेवत आजही कार्यरत आहेत ही अधिक महत्त्वाची गोष्ट आहे.
उपस्थित रुग्णांना सल्ला देताना डॉ. रामाणी म्हणाले की, आजारी पडल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
संस्थेचे सेक्रेटरी भूषण जाक यांनी आपल्या प्रास्ताविकात शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या आजवरच्या सेवाभावी उपक्रमांचा आढावा घेतला. समाजातील एखाद्या व्यक्तीची वेदना कमी झाली, एखाद्या वृद्धाला पुन्हा व्यवस्थित चालता आले, एखाद्या रुग्णाच्या मनातील भीती कमी झाली तर त्या सेवेचे मूल्य पैशांत मोजता येत नाही आम्हालाही यात आनंद मिळतो.
शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ सुदेन्दु बाबुलकर, डॉ अनुज तिवारी, डॉ शिवम पाटील, डॉ ओमकार शिर्के, स्वाती सावंत, संतोष घाडगे, अजित मोहिते यांनी विशेष मेहनत घेतली.
—























