मंगळवेढा – शहर व तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेस दाखल करून निर्दोष नागरिकांना, विशेषतः समाजातील इज्जतदार व्यक्तींना बदनाम करण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार समाधान आवताडे यांनी केला. खऱ्या ॲट्रॉसिटीच्या घटना घडल्यास दोषींवर तात्काळ व ठोस कारवाई होणे आवश्यक असले, तरी राजकीय द्वेष, वैयक्तिक वैर किंवा स्वार्थापायी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी करून कोणालाही अडकवण्याचा प्रकार यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा त्यांनी दिला.
आज (रविवार, ४ ऑक्टोबर) शिवतर्थावर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी हे विधान केले. यावेळी स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, नगरपरिषदेचे प्रतिनिधी तसेच विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खोट्या केसांची चौकशी करा
आमदार आवताडे यांनी मागील पाच ते दहा वर्षांत दाखल झालेल्या खोट्या ॲट्रॉसिटीच्या केसेसची चौकशी करण्यासाठी सर्वसमावेशक समिती स्थापन करावी, अशी मागणी केली. या समितीत सर्व समाजांचे प्रतिनिधी समाविष्ट करावेत, असेही त्यांनी सुचविले. त्यामुळे खऱ्या व खोट्या प्रकरणांमधील फरक स्पष्ट होईल आणि निर्दोष नागरिकांना न्याय मिळेल, असे त्यांनी म्हटले.
“खऱ्या गुन्हेगारावर कारवाई होणे आवश्यक आहे; परंतु निर्दोष नागरिकांना अडकवण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर जनता गप्प बसणार नाही. अन्यायाविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरण्यास तयार आहोत,” असे निर्देशक विधान आमदार आवताडे यांनी बैठकीत केले.
अनिता काळुंगे प्रकरणात चौकशी
अनिता काळुंगे यांच्या प्लॉटवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याच्या सूचना आमदार आवताडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सरकारी किंवा खाजगी जागेवरील अतिक्रमण हट्टाच्या मोहिमेत कोणीही राजकीय दबाव आणू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच अनिता काळुंगे यांच्या प्रकरणात पोलीस स्टेशनकडून अडचणी निर्माण करण्यात आल्याचा आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात दोषी अधिकारी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहवाल दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थिनींची सुरक्षा आवश्यक
शाळा व महाविद्यालय परिसरातील रोडरोडीमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींची छेडछाड होत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित राहिला. अशा घटनांना तात्काळ आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून शैक्षणिक वातावरण सुरक्षित राहील, अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली.
नगरपालिकेतील नगरसेवकांविरोधातील तक्रारी गंभीर असल्यास त्यांची चौकशी करून योग्य कारवाई करावी. कोणत्याही पदाचा गैरवापर करून जनतेची दिशाभूल करू नये, असेही त्यांनी सांगितले.
दामाजी चौकात कायमचा पोलीस
दामाजी चौक परिसरात गर्दी दिवसेंदिवस वाढत असून, या ठिकाणी बसस्थानक, पंचायत समिती कार्यालय, राष्ट्रीयीकृत बँक, पेट्रोल पंप, शाळा, दामाजी मंदिर, कल्याण प्रभू देवस्थान व पोस्ट ऑफिस असल्याने नागरिकांची ताफा मोठ्या प्रमाणात असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या परिसरात कायमस्वरूपी एक पोलीस नेमावा, अशी मागणी आमदार आवताडे यांनी केली.
नवरात्रोत्सव मंगळवेढ्यात मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने तो शांततेत व एकोप्याने साजरा करावा. कोणताही गैरप्रकार किंवा वाद भडकवू नये; सर्वांनी संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रशासनाला दिलेले निर्देश
प्रवीण खवतोडे यांचा माफीनामा रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत घ्यावा.
अनिता काळुंगे यांच्या प्लॉटमधील अतिक्रमण दोन दिवसांत काढून घ्यावे.
मंगळवेढा नगरपरिषद कार्यालय व पोलीस स्टेशन परिसरात विनाकारण फिरणाऱ्या संबंधित व्यक्तीवर बंधने घालावीत.
गुन्हा दाखल झालेल्या बारा व्यक्तींना २४ तासांत अटक करावी.
“मंगळवेढा ही संस्कृती, शील आणि शांततेची संतभूमी आहे. येथे अन्याय चालणार नाही. आपण पायात पाय न घालता हातात हात घालून विकासाची कामे करूया,” असे आमदार समाधान आवताडे यांनी शेवटी प्रतिपादन केले.