बार्शी – महावितरणच्या पिंपळनेर शाखेच्या पथकाने माढा तालुक्यातील बादलेवाडी येथे वीज चोरीविरोधात तपासणी मोहीम राबवून सहा ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी होत असल्याचे उघडकीस आणले. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ७७ हजार २५० रुपयांची वीज चोरी झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे.
महावितरणच्या पिंपळनेर शाखेचे प्रभारी कनिष्ठ अभियंता अमित सौदागर आवटे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता ते कार्यालयीन सहकारी शहेनशहा इब्राहीम पठाण, स्वप्नील विक्रम वरपे व बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांसह बादलेवाडी येथे अंतर्गत वीज चोरी तपासणीसाठी गेले होते.
तपासणीदरम्यान अण्णा अभिमान वाघमोडे यांच्या घराजवळील लघुदाब वाहिनीवर काळ्या रंगाच्या वायरच्या सहाय्याने आकडा टाकून वीज वापरल्याचे आढळले. त्यांच्या ठिकाणी ४७६ युनिट, ९ हजार ३९० रुपये वीज चोरी झाल्याचे नमूद आहे. त्यानंतर सोमनाथ अभिमान वाघमोडे यांच्याकडे ६०५ युनिट, ११ हजार २० रुपये, दाजीराम हरिश्चंद्र वाघमोडे यांच्याकडे ८६२ युनिट, १९ हजार ९५० रुपये, अशोक विठ्ठल सोनवणे यांच्याकडे ९०८ युनिट, १४ हजार ८५० रुपये, मारुती दगडू वाघमोडे यांच्याकडे ६०५ युनिट, ११ हजार २० रुपये आणि संजय नवनाथ दोलताडे यांच्याकडे ६०५ युनिट, ११ हजार २० रुपये वीजचोरी आढळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या सहाही प्रकरणांत मिळून ७७ हजार २५० रुपयांची वीज चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले असून, प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे एकूण १२ हजार रुपयांची तडजोड रक्कम असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी अण्णा अभिमान वाघमोडे, सोमनाथ अभिमान वाघमोडे, दाजीराम हरिश्चंद्र वाघमोडे, अशोक विठ्ठल सोनवणे, मारुती दगडू वाघमोडे व संजय नवनाथ दोलताडे (सर्व रा. बादलेवाडी, ता. माढा) यांच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
Post Views: 21