बार्शी – शहरातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि २९६ कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना कालमर्यादेत पूर्ण करावी, या मागणीसाठी आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली बार्शी नगरपरिषदेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांची भेट घेऊन निवेदन दिले. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास १४ ऑक्टोबर २०२६ पासून तहसील कार्यालय, बार्शी येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
बार्शी शहराला सध्या तब्बल १५ ते १७ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून, गेल्या सुमारे नऊ वर्षांपासून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाने हा प्रश्न जिल्हास्तरीय अत्यावश्यक बाब म्हणून हाताळावा, अशी मागणी करण्यात आली.
सन १९९६ मधील बार्शी-कुर्डुवाडी संयुक्त पाणीपुरवठा योजनेवरील अवलंबित्व कमी करुन सुधारित २९६ कोटींची योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत पाइपलाईन टाकण्यासाठी शुल्क भरुनही प्रलंबित असलेली कामे, अकोले खुर्द ते एमआयडीसी मार्गावरील अडथळे तसेच हॉटेल वैशाली परिसरातील पाइपलाईनचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
टंचाईच्या काळात टँकरची संख्या वाढवून प्रत्येक टँकरला GPS बसवावे, पाणीवाटपात पारदर्शकता आणावी, प्रमुख ठिकाणी फ्लो मीटर बसवावेत, आधुनिक ‘लीक डिटेक्शन सिस्टिम’चा वापर करावा, अशी मागणीही करण्यात आली. तसेच जलदाय विभागातील रिक्त मंजूर पदे भरणे, पाणीपुरवठा यंत्रणेचे स्वतंत्र तांत्रिक ऑडीट करणे आणि जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली विशेष टास्क फोर्स स्थापन करुन साप्ताहिक आढावा घेण्याची मागणी करण्यात आली.
या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, प्रतोद कृष्णराज बारबोले, नगरसेवक मेहंदीमिया लांडगे, नवनाथ माळगे, अमोल मांगडे, मुजम्मिल पठाण, अनिकेत कारंडे, सचिन मांगडे, मनीष चव्हाण, प्रशांत जाधव, अजय भानवसे, बबलू साळुंखे, बबन नाईकोजी, आर्यन पाचपुते आदींचा समावेश होता.