सोलापूर – बार्शी तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणी व चारा टंचाई तसेच पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी तालुक्याचा आढावा घेतला. टंचाईच्या काळात नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पुढील तीन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
( टीप मेल वरील फोटो लावणे)
सेवा संकल्प अभियानांतर्गत बार्शी पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीत पाणीटंचाई, चारा उपलब्धता, जलजीवन मिशनची प्रलंबित व पूर्ण झालेली कामे यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. टंचाईग्रस्त भागातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश ग्रामसेवक, विभागप्रमुख आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
ग्रामसेवकांकडून तालुक्यातील टंचाई परिस्थितीबरोबरच घरकुल योजना आणि समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज जैन यांनी व्यक्त केली.
यानंतर उपळाई ठोंगे येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याची कार्यवाही वेळेत करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
उपळाई ठोंगे येथील जिल्हा परिषद शाळेलाही जैन यांनी भेट दिली. शाळेतील जिल्ह्यातील उत्कृष्ट परसबागेची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. अशा उपक्रमांचा शैक्षणिक विकासासोबत विद्यार्थ्यांच्या पोषणावरही सकारात्मक परिणाम होत असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.
नुकत्याच सुरू झालेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचीही पाहणी करण्यात आली. पशुपालकांना पशुधनाच्या आरोग्यासाठी आवश्यक उपचार व सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.यावेळी प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, सभापती मीनाक्षी रोंगे, गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांच्यासह तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
पानगाव आरोग्य केंद्रात ओपीडी वाढविण्याचे निर्देश
पानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन इमारत व उपलब्ध आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवरच अधिक चांगली आरोग्यसेवा मिळावी, यासाठी ओपीडीची संख्या वाढविण्याच्या सूचना जैन यांनी दिल्या.
चौकट
बचतगटांच्या उद्योगांना चालना देण्याच्या सूचना
महिला बचतगटाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून मंजूर कर्जे, सुरू असलेले उद्योग आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेण्यात आली. ग्रामीण महिलांना स्वावलंबी करण्यासाठी बचतगटांच्या माध्यमातून उद्योगनिर्मिती आणि आर्थिक उपक्रमांना अधिक चालना देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
Post Views: 17