पंढरपूर – पुस्तक वाचनातून मुक्त, स्वतंत्र विचार करणारा आणि निर्भय माणूस तयार होतो. इंद्रधनुष्याचे विविध रंग शोधताना जो आनंद मिळतो, तसाच आनंद पुस्तकाची समीक्षा लिहिताना आणि वाचताना मिळतो. चांगले लेखन माणसाला अंतर्मुख करते, सुख-समाधान देते आणि मनात चांगल्या विचारांची पेरणी करते. पुस्तक हे केवळ ज्ञानाचे साधन नसून नवा माणूस आणि संस्कृती घडविण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सुप्रसिद्ध साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या ‘माझे विद्यार्थी’ या व्यक्तिचित्रणसंग्रहावर आधारित ‘माझे विद्यार्थी : सौंदर्य आणि समीक्षा’ या समीक्षासंपादित ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ना. उदय सामंत व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या समीक्षाग्रंथाचे संपादन डॉ. वामन जाधव, डॉ. दत्तात्रय डांगे, डॉ. किसन माने आणि प्रा. मुकुंद वलेकर यांनी केले आहे. या संपादकांनी रघुराज मेटकरी यांच्या ‘माझे विद्यार्थी’ या ग्रंथाचा विविध अंगांनी चिकित्सक अभ्यास करून त्यातील साहित्यिक सौंदर्य, व्यक्तिचित्रणाची वैशिष्ट्ये, शिक्षक-विद्यार्थी संबंध आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव अधोरेखित केले आहे.
उदय सामंत म्हणाले की, आजच्या काळात नव्या समीक्षाग्रंथांची मोठी गरज आहे. साहित्याचे वाचन आणि त्यावरील समीक्षा ही वाचकाला केवळ साहित्यकृती समजून घेण्यास मदत करत नाही, तर त्याला स्वतःकडे आणि समाजाकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची दृष्टी देते. चांगले साहित्य समाजाच्या मानसिक जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अशा प्रकारचे समीक्षात्मक लेखन अधिक व्यापक प्रमाणात होणे आवश्यक आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनात विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. प्रकाश महानवर यांनी ‘माझे विद्यार्थी’ या ग्रंथाचे आणि नव्या समीक्षाग्रंथाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, रघुराज मेटकरी लिखित ‘माझे विद्यार्थी’ हा ग्रंथ मुळातच सुंदर आहे आणि त्यावर आधारित ‘माझे विद्यार्थी : सौंदर्य आणि समीक्षा’ हा समीक्षाग्रंथ अतिशय सुंदर झाला आहे. ग्रामीण भागातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारे आंतरिक, जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते या पुस्तकातून प्रभावीपणे वाचायला मिळते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याचे विविध पैलू या साहित्यकृतीतून उलगडले आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. महेश खरात यांनी केले. त्यांनी समीक्षाग्रंथाच्या निर्मितीमागील भूमिका आणि ‘माझे विद्यार्थी’ या ग्रंथाचे साहित्यिक महत्त्व स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रा. कांबळे मॅडम यांनी केले, तर डॉ. दत्तात्रय डांगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या वेळी महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. श्यामकांत देवरे, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे, माजी मंत्री व विद्यमान आमदार सुभाषबापू देशमुख, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, मानवविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. महेश खरात, समीक्षाग्रंथाचे संपादक डॉ. वामन जाधव, डॉ. दत्तात्रय डांगे, डॉ. किसन माने, प्रा. मुकुंद वलेकर, शास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. तिळवेकर, डॉ. दिवाकर कुलकर्णी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमास मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा गुंड, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. उमराव मेटकरी, डॉ. ऋषिकेश मेटकरी, योगेश्वर मेटकरी यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच मराठीतील दर्जेदार साहित्याचे वाचन, चिंतन आणि समीक्षा यांना चालना देणारा हा प्रकाशन सोहळा साहित्यप्रेमी आणि विद्यापीठातील उपस्थितांसाठी विशेष ठरला.
Post Views: 12