अकलूज – शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर येथे विविध क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, स्थानिक प्रशाला समितीचे सदस्य श्री नवनाथ पांढरे साहेब व सौ. कोमल देशमुख, व खेळाडूंचे पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथी, यशस्वी खेळाडू व पालक यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते- पाटील व श्रीमती रत्नप्रभादेवी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विविध तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा व त्यांच्या पालकांचा गुलाबांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचा संदेश या सत्काराच्या निमित्ताने देण्यात आला.
क्रीडा स्पर्धेतील कुस्ती व ज्युदो या खेळ प्रकारामध्ये प्रशालेतील कु. *सई वाघ आणि कु. मयुरी काळे* या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली,तसेच कबड्डी व योगासने या खेळ प्रकारात ही सहभागी विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी केली.
याप्रसंगी कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी आपल्या मनोगतांमध्ये यशस्वी सर्व खेळाडूंचे व पालकांचे कौतुक आणि अभिनंदन केले. सर्व विद्यार्थिनींनी शारीरिक, मानसिक व भावनिक दृष्ट्या सक्षम राहून, आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. ‘संघर्षाशिवाय उत्कर्ष नाही.’ असा संदेश देत, विद्यार्थिनींना प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्व खेळाडूं , पालक तसेच मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांचे कौतुक करून अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता पवार, सूत्रसंचालन सौ. स्वाती पाचपुंड व सौ. रचना रणनवरे यांनी केले. तसेच आभार अनंत कोळी सर यांनी केले.
Post Views: 16