पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय, पंढरपूरच्या तीन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.
महाविद्यालयाचा सुरज गायकवाड (११० किलो वजनगट), प्रणव चव्हाण (९५ किलो वजनगट) आणि सत्यजित शिरकर (८५ किलो वजनगट) यांनी आपल्या-आपल्या वजनगटात दमदार कामगिरी करत रौप्यपदकावर नाव कोरले. या तिन्ही खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ. समाधान माने, डॉ. बी. एस. बलवंत, डॉ. राजेश कवडे, डॉ. एस. के. शिंदे, जिमखाना विभागप्रमुख प्रा. अनिल परमार, प्रा. डॉ. उमेश साळुंखे, प्रा. विठ्ठल फुले, प्रा. मनोज खपाले यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेला नवी झळाळी मिळाली असून, आगामी स्पर्धांसाठी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
Post Views: 12