सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री यमाईदेवी मंदिराचा शारदीय नवरात्रोत्सव रविवार, दि. ११ ऑक्टोबरपासून भक्तिमय वातावरणात सुरू होत आहे. तब्बल ८१४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवात नऊ दिवस विविध धार्मिक विधी, सप्तशती पाठ आणि नवचंडी होम होणार आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त भव्य पालखी, सीमोल्लंघन आणि श्री यमाईदेवी-श्री तुळजाभवानी यांच्या ऐतिहासिक भगिनी भेटीचा सोहळा रंगणार आहे.
देवस्थानचे मुख्य विश्वस्त व मुख्य पुजारी डॉ. रंगनाथ गुरव आणि ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांनी उत्सवाच्या कार्यक्रमांची माहिती दिली.
देवीच्या प्रकट दर्शनाची ऐतिहासिक आख्यायिका
कर्नाटक राज्यातील काळगी येथील निस्सीम देवीभक्त रंगनाथ स्वामी गोसावी (मोकाशी) यांनी माहूरगडावर तब्बल बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर बालाघाटाच्या पायथ्याशी आणि मार्कंडेय ऋषींच्या तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारोडी अर्थात आजच्या मार्डी गावात देवीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यानंतर देवी मूर्तीच्या रूपात येथेच स्थिरावली, अशी या प्राचीन देवस्थानची आख्यायिका आहे. त्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
नवरात्रोत्सवातील नित्य धार्मिक कार्यक्रम
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंदिरात धार्मिक विधींची रेलचेल राहणार आहे. दररोज पहाटे ४ वाजता महापूजा, सकाळी ९.३० वाजता नित्यपूजा व अभिषेक, तर रात्री ८ वाजता शेजारती होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी विविध गावांतील शक्तीमंडळांचे कार्यकर्ते श्री यमाईदेवी मंदिरातून श्रद्धेने ज्योत घेऊन प्रस्थान करतील. मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, सांगोला, करमाळा आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील भाविकांचा या सोहळ्यात सहभाग राहणार आहे.
१९ ऑक्टोबरला नवचंडी होम
सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी ६ वाजता श्री रेणुकादेवी मंदिरात नवचंडी होम, तर सकाळी ११ वाजता श्री यमाईदेवी मंदिरात नवचंडी होम, अजाबळी व महापूजा होईल. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता मंदिरातील घटोत्थापन विधी पार पडणार असल्याची माहिती ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांनी दिली.
यंदा खंडेनवमी आणि विजयादशमी एकाच दिवशी येत असल्याने गावातील घरोघरी स्थापन केलेले घट मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी उठविण्यात येणार आहेत.
यमाईदेवी-तुळजाभवानी भगिनी भेटीचा ऐतिहासिक सोहळा
श्रीक्षेत्र मार्डी येथील नवरात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यमाईदेवी आणि तुळजाभवानी यांच्या भेटीचा सोहळा. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटक राज्यातून लाखो भाविक या उत्सवासाठी येतात. नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिरात सप्तशती पाठ केले जातात. आद्य देवीभक्त रंगनाथ स्वामी मोकाशी यांचे वंशज ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांच्याकडे सप्तशती पाठ आणि नवचंडी होमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री यमाईदेवी मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. गावाच्या पूर्वेला होनसळ रस्त्यावर असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या ठाण्याकडे, म्हणजेच पावकाई मंदिराकडे, पालखी मार्गस्थ होईल. सायंकाळी ६ वाजता दोन्ही भगिनी देवतांच्या भेटीचा भावपूर्ण सोहळा आणि सीमोल्लंघन पार पडेल.
या सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी पालखी मार्गावर सडा-रांगोळी करून परिसर सुशोभित करावा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. रात्री ८ वाजता पालखी मंदिरात परतल्यानंतर शेजारती व महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत ही परंपरा जपली जाणार आहे.
भाविकांना दर्शनाचे आवाहन
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या पवित्र नवरात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री यमाईदेवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. रंगनाथ गुरव, ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी, मार्डीच्या सरपंच प्रांजली गणेश पवार, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, उपसरपंच श्रीकांत मार्तंडे, देवीभक्त विठ्ठल काशीद, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर जगताप, मार्डी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, ग्राम अधिकारी नंदकुमार पाटील, ग्राम महसूल अधिकारी दीपक कावले, ॲड. इंद्रजीत पाटील, देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त शिवाजी गुरव, विश्वस्त पुष्पा गुरव, दत्तात्रय गुरव तसेच पुजारी अशोक गुरव, विकास गुरव, वैभव गुरव, सुनील गुरव आणि निलेश गुरव यांनी केले आहे.
Post Views: 4