पंढरपूर – पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने निर्मित ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६ ’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ या श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सरकार आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे वैभव असलेल्या पंढरपूर वारीची भक्तिमार्गातली समृद्ध भक्तिपरंपरा जगासमोर आणण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आणि डिस्कव्हरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरून त्याचे प्रसारण करण्यात आले आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पंढरपूर वारी ही भक्तिमार्गातील अतिशय प्राचीन परंपरा आहे. जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता ही परंपरा सर्वांना विठुरायाच्या भक्तिरंगात रंगवून एकत्र आणते. ही महान परंपरा, तिचे उद्दिष्ट आणि विचार जगभर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ हा सुंदर माहितीपट तयार करून प्रदर्शित करण्यात आला आहे. या माहितीपटाला ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये भारत देशासाठीचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे मी अभिनंदन करतो. वारीची गौरवशाली परंपरा जगासमोर मांडणारा हा माहितीपट सर्वांनी पाहावा,” असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
Post Views: 9