वैराग – बार्शी शहर आणि तालुका परिसरात अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याची गुप्त माहिती मिळताच, सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतः मैदानात उतरत मोठ्या कारवाईचा बडगा उगारला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली चालणारा देहव्यापार, मटका-जुआराचे छापे आणि प्रतिबंधित गुटखा विक्रीविरुद्ध ही धडक मोहीम राबवण्यात आली. या संपूर्ण कारवाईत ४,२०,१०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली कुंटणखाना; दोन ठिकाणी धाडी, महिलांची सुटका
बार्शी शहर व तालुका हद्दीत ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली अनैतिक मानवी व्यापार (वेश्या व्यवसाय) सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यावरून धाड टाकून २ स्पा सेंटरवर कारवाई करत पीडित महिलांची सुटका करण्यात आली:
* द मूनलाईट स्पा (बार्शी-लातूर बायपास रोड): येथे दीपक गव्हाणे, पृथ्वीराज घोडके, केतन प्रकाश धामणेकर (सर्व रा. बार्शी) यांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकास मॅनेजर म्हणून ठेवून, स्पा सेंटरचा वापर कुंटणखान्यासारखा करत असल्याचे निष्पन्न झाले.
* डिलक्स स्पा (नागोबाचीवाडी शिवार, बार्शी बायपास): येथे व्यवस्थापक बाबाभाई खाजाभाई चौधरी आणि मालक आकाश काशिद यांनी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय चालवल्याचे समोर आले.
> तपासाची चक्रे वेगाने: याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक महादेव चव्हाण यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे. आरोपींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचा शोध सुरू आहे.
>
२. जुगार आणि मटका अड्ड्यांवर धाडी; लाखोंचा मुद्देमाल जप्त
बार्शी शहरात अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या पथकाने एकाच वेळी ३ ठिकाणी छापे टाकले:
* सुभाष नगर जावळे प्लॉट: एका बंद घरात मटका खेळताना प्रदीप वाघमारे, सचिन नगरे, रामचंद्र पवार, बलराम जाधव, रवि खळदगे, रविंद्र मदने, सचिन सामदळे, अमोल वायचळ, आनंद गिरी, अक्षय गिरी, दिनेश पवार, आणि विनोद उमाटे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल व वाहने असा ३,१४,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
* पोस्ट चौक परिसर: कल्याण मटका खेळताना दत्तात्रय संतोष गंधे, बालाजी राजाराम सुतार, शरीफ गुलाब तांबोळी, बापू दगडू गुळवे, कर्ण सोमनाथ इंगळे, आणि सतीश सुभाष नगवण यांच्यावर कारवाई करून ८४,८७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
* लता टॉकीजजवळ (रोन पान शॉप): मटका जुगार घेणारा सतीश तुकाराम माने (रा. लोकमान्य चाळ, जामगाव रोड, बार्शी) याच्याकडून २०,८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
३. बसस्थानकाजवळ गुटख्याचा साठा जप्त व सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कारवाई
* प्रतिबंधित गुटखा जप्त: खांडवी (बार्शी-कुर्डूवाडी रस्ता) येथील बसस्थानकाजवळ असलेल्या ‘शिवसाक्षी पान टपरी’वर छापा टाकून २७,१०४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाला (FDA) याबाबत पुढील कारवाईसाठी माहिती देण्यात आली आहे.
* मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे: सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या ३ जणांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आणि ७ जणांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.
कायद्याचा धाक: MPDA व हद्दपारीची कारवाई करणार!
> “सोलापूर ग्रामीण हद्दीत अवैध व्यवसायांविरुद्ध मोहीम अशीच तीव्र ठेवली जाईल. यापुढे अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर MPDA (झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा) आणि हद्दपारीसारख्या अत्यंत प्रभावी व कडक प्रतिबंधक कारवाया करण्यात येतील.”
> — अतुल वि. कुलकर्णी (पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण)
>
कारवाईत सहभागी पोलिस पथक:
ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती अंजना कृष्णा (ASP करमाळा), अनिल सनगल्ले (वाचक), पोकॉ धरेप्पा होनमोरे, पोकॉ प्रशांत जाधव, मपोकॉ श्रीदेवी प्रचंडे, मपोकॉ विद्या राऊत, A.H.T.U. च्या सपोनि श्वेता चव्हाण, पो.उप.नि. रेवणसिद्ध काळे, मसपोफौ शारदा घोळवे, पोहेकॉ सूर्यकांत जाधव, पोहेकॉ प्रविण वाळके, पोहेकॉ लक्ष्मण राठोड, मपोकॉ प्रिती पाटील, चालक चपोहेकॉ शिंदे, होमगार्ड रविंद्र जाधव, QRT व RCP ची पथके यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली.
Post Views: 6