अकलूज : अकलूज व परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शंकरनगर येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे ‘सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील वाचनालय’ सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या वाचनालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि. १५ ऑक्टोबर) स.म. शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन तथा शंकरराव मोहिते पाटील हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ट्रस्टचे सचिव सुहास यादव, सदस्य सुभाष खटके, व्यवस्थापन समितीचे वसंत जाधव, यशवंत माने देशमुख, वसतिगृह विकास समितीच्या मंगल वाघमोडे, अर्चना गायकवाड, हसीना शेख, समन्वयक पोपटराव भोसले-पाटील, प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात विकास समितीच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), स्टाफ सिलेक्शन कमिशन, प्रशासकीय सेवा, पोलीस भरती, बँकिंग, रेल्वे, सरळ सेवा भरती, शिक्षक पात्रता परीक्षा अशा विविध परीक्षांत यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार संदर्भ साहित्याची गरज असते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शांत जागा, आवश्यक पुस्तके व इंटरनेट सुविधेअभावी अडचणींना सामोरे जावे लागते. ही गरज लक्षात घेऊन महाविद्यालयाने मासिक १५१ रुपये व वार्षिक १५०० रुपये या नाममात्र शुल्कात वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त स्थानिक पातळीवरच ही सुविधा मिळाल्याने अभ्यासासाठी दूरच्या शहरांत जाण्याची गरज कमी होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबांतील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होईल. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, अभ्यासाची शिस्त लावणे आणि स्पर्धा परीक्षांतील यशाच्या संधी वाढविणे, या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. वाचनालयासाठी जागा मर्यादित असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाविद्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नावनोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ वाचन प्रेरणादिन निमित्त खास याचे उदघाट्न केले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी लातूर येथे झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत महाविद्यालयातील मुलींच्या हॉलिबॉल संघाने तृतीय क्रमांक पटकवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उदघाट्क जयसिंह मोहिते-पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक करताना याठिकाणी अनेक विभागातून वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जात असून यामधील अनेक विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले. येथील ४६५ विद्यार्थी हे सध्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या वतीने खास ग्रामीण भागातील मुला मुलींना दर्जेदार शिक्षणाची व अभ्यासाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने वाचनालयाची सुविधा निर्माण केली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केवळ बौद्धिक शिक्षण न घेता विविध इतर उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. मानसिक स्वास्थ्य मजबूत ठेवण्यासाठी मोबाईल मध्ये वेळ न घालवता कोणत्याही एका छंदाची जोपासना करावी असा मोलाचा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मीनाक्षी राऊत यांनी केले तर आभार सौ. मंगलताई वाघमोडे यांनी मानले.
Post Views: 22