सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूरच्या सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी भेट देऊन शिक्षण, आरोग्य,तसेच घरकुल योजनांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी विविध शासकीय संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
दौऱ्यादरम्यान त्यांनी बोरामणी येथील ‘ड’ श्रेणीतील उर्दू प्राथमिक शाळेला भेट देऊन शाळेतील भौतिक सुविधा, वर्गखोल्या आणि इतर अडचणींची पाहणी केली. शिक्षकांशी संवाद साधून शाळेतील समस्यांची माहिती घेतली.
त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत संवाद साधत आपला आत्मविश्वास व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी संवाद कौशल्य पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी समाधान व्यक्त केले
तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले.
यावेळी त्यांनी अंगणवाडीला भेट देऊन बालकांना दिला जाणारा पोषण आहार, पूर्वप्राथमिक शिक्षण व विविध उपक्रमांची माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून औषधसाठा, रुग्णांना उपलब्ध असलेल्या सुविधा आणि आरोग्य सेवांचा आढावा घेतला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
तसेच गावातील शासकीय घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन घरकुलांच्या कामांची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवाद साधला. या दौऱ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
Post Views: 15