पंढरपूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सांगोला बास्केटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित १९ वर्षांखालील शालेय जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत वाखरी (पंढरपूर) येथील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल ज्युनिअर कॉलेजच्या मुलांच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेतेपदावर नाव कोरले. सांगोला विद्यामंदिर येथे पार पडलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच कमालीचे सांघिक कौशल्य, वेगवान चाली आणि उत्कृष्ट समन्वयाचे दर्शन घडवत प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये खेळाडूंनी जिद्दीच्या जोरावर मोलाचा लढा देत हे घवघवीत यश मिळवले. या उपविजेत्या संघामध्ये कर्णधार तन्मय उद्धव होले आणि उपकर्णधार प्रशांत हणमंत खरात यांच्यासह कार्तिक कदम, धीरज कदम, उदय खरात, प्रणव जठार, ओम खटकाळे, अबूबकर नदाफ, मोहित कांबळे, तनिष्क देशमाने, राजवीर बोरसुरे आणि प्रतीक गायकवाड या खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रविण पिसाळ यांचे मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी आणि प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ यांनी सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
Post Views: 23