सोलापूर : आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिनानिमित्त फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेच्या वतीने श्री रूपाभवानी मंदिर परिसरात आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रबोधन व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवरात्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या देवीभक्तांना आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, गर्दीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
पोलीस निरीक्षक सचिन यादव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगरसेवक विनायक विटकर, स्वीकृत नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, रूपाभवानी मंदिर समितीचे ट्रस्टी , वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश येणपे, सागर बामणे, गणेश इंगळे, राधा जेऊघाले आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संबंधित आपदा मित्र रामचंद्र वाघमारे व बजरंग व्हटकर यांनी आपत्तीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी, गर्दीचे व्यवस्थापन आणि बचावकार्य याबाबत मार्गदर्शन केले. मंदिर परिसरात कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांना हृदयविकार किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करता यावी, यासाठी सीपीआर (हृदय-फुफ्फुस पुनरुज्जीवन) प्रशिक्षणही देण्यात आले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. डॉ. येळेगावकर म्हणाले, आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वयंसेवकांनी सदैव सज्ज असणे आवश्यक आहे. आपत्ती घडल्यानंतर उपाययोजना करण्याबरोबरच ती टाळण्यासाठी योग्य पूर्वनियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आकाश गायकवाड यांनी तर आभारप्रदर्शन गीतगंगा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व्यंकटेश कंची यांनी केले.
—–
Post Views: 10