सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने सन २०२५-२६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणादरम्यान अस्तित्वात नसलेल्या तसेच दुबार नोंद असलेल्या मालमत्तांवरील वसूल न होणारा कर नियमानुसार निर्लेखित करण्याची कार्यवाही केली आहे. या प्रक्रियेत एखादी अस्तित्वात असलेली मालमत्ता अनवधानाने निर्लेखित झाल्याचे आढळल्यास संबंधित थकबाकीसह ती पुन्हा अभिलेखात समाविष्ट करण्याची तरतूद आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात नागरिकांना काही हरकत असल्यास १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत तक्रार नोंदविता येणार आहे.
महानगरपालिकेच्या अभिलेखांमध्ये काही मालमत्ता अस्तित्वात नसतानाही किंवा त्यांची दुबार नोंद असल्याने त्यांच्यावरील कराची थकबाकी दरवर्षी वाढत होती. प्रत्यक्षात वसूल होऊ न शकणाऱ्या या थकबाकीमुळे मालमत्ता कराची एकूण आकडेवारी फुगलेली दिसत होती. त्यामुळे अभिलेखांतील नोंदींची पडताळणी करून अशा मालमत्तांवरील कर निर्लेखित करण्याची कार्यवाही करण्यात आली.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १५२ नुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली. संबंधित मालमत्तांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पंचनामे करण्यात आले. त्यानंतर निर्लेखित करावयाच्या मालमत्तांची यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. निर्धारित मुदतीत कोणत्याही हरकती प्राप्त न झाल्याने या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
दरम्यान, निर्लेखित करण्यात आलेल्या मालमत्तांच्या यादीबाबत किंवा एखाद्या मालमत्तेच्या अस्तित्वाबाबत नागरिकांना हरकत असल्यास आवश्यक कागदपत्रे व पुराव्यांसह आयुक्त कार्यालय, उपायुक्त (मालमत्ता कर) कार्यालय किंवा
smcpropertytax@gmail.com
या ई-मेलवर लेखी तक्रार करता येईल. प्राप्त तक्रारींची महानगरपालिकेच्या अभिलेखांच्या आधारे तपासणी करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
नागरिकांनी मालमत्तेच्या नोंदींबाबत काही त्रुटी आढळल्यास मुदतीत हरकत नोंदवावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
——