डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे हे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पहायला मिळत आहे. डॉ.रोंगे हे गेल्या वर्षापासून पुणे विभाग मतदार संघातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व सोलापूर या पाचही जिल्ह्यांतील शाळा व कॉलेज मधील पदाधिकारी व शिक्षकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे. त्यांना पाचही जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांतील शिक्षकांचा भक्कम प्रतिसाद मिळत आहे. मतदार नोंदणी पासून निवडणूकीच्या सर्व प्रक्रिया याबाबत डॉ. रोंगे हे प्रत्येक शाळेत, प्रत्येक शिक्षकांना, संस्थाचालकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेट देवून चर्चा करत आहेत. या चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या आठवड्यात सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील आर. एम. हायस्कूल मिरज, आयडियल इंग्लिश स्कूल मिरज, मिरज महाविद्यालय मिरज, कन्या महाविद्यालय मिरज, विद्या प्रशाला मिरज, बळवंतराव मराठे विद्यालय मिरज, संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, विद्यादीप इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज, जुबली इंग्लिश स्कूल मिरज असे मिळून जवळपास २२ शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन डॉ. रोंगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
या भेटी दरम्यान बोलताना डॉ.बी.पी. रोंगे यांनी सांगितले की, ‘आज शिक्षकांसमोर अनेक प्रश्न, अडचणी, समस्या आहेत. त्या सर्व शासन पातळीवर अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. टीईटी, जुनी पेन्शन योजना अशा अनेक समस्या आहेत, त्यांचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. खरे पाहता हे प्रश्न फार पूर्वी सुटायला हवे होते. परंतु उदासीनतेमुळे ते सुटलेले नाहीत. यासाठी जर आपण सेवा करण्याची संधी दिली तर जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न करून अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी कोठेही कमी पडणार नाही.’ अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.