बार्शी – भाजपा-महायुतीच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. सौ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचारार्थ बार्शी येथे पदवीधर व शिक्षक मतदारांचा संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी करमाळ्याचे आमदार नारायण (आबा) पाटील यांच्यासह भाजपा-महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उच्च शिक्षण क्षेत्र आणि पदवीधरांच्या हितासाठी महायुती सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. तसेच दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी समन्वयाने आणि जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीवर भर दिला. पदवीधर व शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वय राखावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी भाजपा नेते राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातून दोन्ही उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने प्रयत्न करतील, असा निर्धार उपस्थितांच्या समवेत व्यक्त केला.
या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून पदवीधर व शिक्षक मतदारांशी संपर्क साधण्यावर आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीला गती देण्यावर भर देण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, उपसभापती संतोष निंबाळकर, बाजार समितीचे सभापती विजय गरड, अरुण बारबोले, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत, भाजपा शहराध्यक्ष महावीर कदम, पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.