सोलापूर : रविवार पेठ परिसरातील गादी कारखान्याला रविवारी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांनी भीषण आग लागली. कारखान्यातील गादी, कापड, कापूस आदी ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. ही आग शेजारील दुकानांमध्येही पसरल्याने एकूण तीन दुकानांतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आठ गाड्यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
रविवार पेठेतील गादी कारखान्याला आग लागल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. कारखान्यात गादी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कापड, कापूस आणि अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरली. शेजारील दुकानांनाही आगीची झळ बसली. सुपर स्टीलच्या गोडाऊनसह गादी कारखाना आणि इलेक्ट्रिक वायरिंगच्या दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. संबंधित तीन गाळ्यातील साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांच्यासह जवान घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांद्वारे पाण्याचा मारा करण्यात आला. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमुळे परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरले होते. ही आग पाहण्यासाठी दुकानदारांसह नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत तीन दुकानांतील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट झालेला नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.