सोलापूर – विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषयांची गोडी लागावी, अवघड संकल्पना कृतीतून समजाव्यात आणि शिक्षण अधिक आनंददायी व्हावे, या उद्देशाने शाळांना उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक साहित्यच पेटीत बंद असल्याचे समोर आले आहे. अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथील मराठी, उर्दू व कन्नड जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली. त्यांनी स्वतः पेटी उघडून साहित्याची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांना त्याचा लाभ का मिळाला नाही, असा थेट सवाल उपस्थित करत संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांकडून खुलासा मागविण्याचे निर्देश दिले.
( टीप मेल वरील फोटो लावणे विनंती )
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामध्ये ‘गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी पेटी’ महत्त्वाची आहे. या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती, प्रयोग आणि विविध शैक्षणिक उपक्रमांद्वारे विषय समजून घेता येतात. मात्र, कडबगाव येथील शाळा भेटीदरम्यान पेटी उपलब्ध असूनही ती उघडण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले.
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी स्वतः पेटी उघडून आतील साहित्याची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपयुक्त असलेले साहित्य वापराविना पडून असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ साहित्य उपलब्ध करून देऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढत नाही, तर त्याचा नियमित आणि प्रभावी वापर अध्यापनात झाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांनी शैक्षणिक साहित्याचा वापर का केला नाही, याबाबत खुलासा सादर करण्याच्या सक्त सूचना कुशल जैन यांनी दिल्या. यापुढे उपलब्ध साहित्याचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या भेटीदरम्यान शाळांमधील भौतिक सुविधांचाही आढावा घेण्यात आला. वर्गखोल्यांमधील सुरक्षित प्रकाशव्यवस्था, शालेय पोषण आहार, स्वयंपाकगृह अर्थात किचन शेड आणि इतर आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी शिक्षक व मुख्याध्यापकांनी आवश्यक बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शाळांमध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर, पायाभूत सुविधांची गुणवत्ता आणि अध्यापनातील कृतीशीलता या बाबींवर प्रशासनाने भर दिल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळू शकते. कडबगाव येथील या भेटीतून शैक्षणिक साहित्याच्या उपलब्धतेपेक्षा त्याचा प्रत्यक्ष वापर आणि विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ अधिक महत्त्वाचा असल्याचा संदेश देण्यात आला.
या वेळी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके आणि गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे उपस्थित होते.
कोट
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी तडजोड नको!
शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या शैक्षणिक साधनांचा वापर न होणे ही विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना विषय समजण्यासाठी कृतीशील अध्यापनावर भर देणे आवश्यक आहे. विशेषतः गणित आणि विज्ञानासारख्या विषयांमध्ये प्रयोग, प्रतिकृती आणि प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची समज वाढविता येते.
– कुशल जैन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर




















